Tuesday, December 14, 2010

सागर हा असा कोपला का?

२६ डिसेंबर २००४  मध्ये जेव्हा त्सुनामी आल्या होत्या तेव्हा त्याने पहिली कविता केली होती..
त्याच्या पहिल्या कवितेनेच या blog  ची सुरुवात करणार आहे..

सागर हा असा कोपला का?


जीव जनावर देत आला ठाय
सागर हा असा कोपला का?

स्वप्ना पहाटेचे खरेचं होणारे
घरातले सारे गोड स्वप्नी..!
पाहता पाहता दृष्टी गेली पार
सकाळी अंधार अनंताचा..!

भूकंप होऊन पाणी उसळले
परास्त होऊन आणि कोसळले..!
कोसळलेले पाणी घरांवर खेळले
अश्रू ओघळले अखेरचे..!

कोणती अशी हि सागराची माया
कालीकुत्ता  छाया  मरणाची..!
सागराला होता किनारा धरून
 त्याचेही भरून आले मन..!

ज्याने दिले जीवन त्याने दिले मरण
नसताना कोणी कोणतेही कारण..!
लोकांचे या कसे भाग्य असे खोटे
सकाळी सूर्यास्त पाहण्याचे..!

वर्ष अखेर जीवन  नष्ट झाले
वर्षा बरोबर लोकही गेले..!
गेले  त्यांना आता कोणी कसे गावे
पुन्हा  उगवावें जोमदार..!

सुरुवात.......

बसल्या बसल्या मनात एक विचार घोळू लागला....मन क्षणभर त्याचाच विचार करू लागले..आयुष्यात खूप काही  मिळतं...खूप काही गवसतं.. कित्येक माणसं भेटतात..पण ती चांगली की वाईट हे मात्र आपल्यावर अवलंबून असतं.. श्रीकांत...  the  Name  of  Lord  Krishna ...लहान भाऊ..पण त्याचे विचार अगदी मोठ्या सारखे ..   त्याच्याकडून खूप काही शिकलो.. वयाच्या १३-१४ व्या वर्षी हातात वही पेन घेऊन कविता करत बसायचा..सतत काहीतरी वाचत रहायचा..आयुष्य भरात कोणी जितकं पुण्य कमवलं नसेल तितकं तो त्याच्या लहानश्या  आयुष्यात कमवून गेलाय....गेलाय कुठे..जवळच आहे..आमच्या आसपास आहे..जातो तो फक्त देह..जो कधी न कधी तरी जाणारच असतो..

स्वतःच्या कवितांचा पुस्तक publish करायचा त्याचा स्वप्नं होतं..आम्ही ते पूर्ण करू..आता तर हि फक्त सुरुवात आहे..
मला खूप लिहायचंय..त्यासाठी काहीपण करेन..असाच त्याचा दृष्टीकोन होता..आपलं ध्येय साध्य करायचं होतं त्याला..
आता तो क्षण आलाय..वाटत उठाव आणि आभाळालाही सांगावा..
तो क्षण आलाय..
त्यामधला आनंद....
न कोणीही अडवणारा..न कोणी थांबवणारा..
वाटतं सगळ्यांना सांगावं..
आज मनासारखा झालंय..
कुठलीतरी गोष्ट सुख देऊन गेलीये..
कदाचित  त्याला कळला ही असेल तो आनंद..
त्याच्या स्वप्नांची सुरुवात आता होतेय..
नेहमी दुसऱ्यांसाठी काहीतरी करणारा...
आज आम्ही त्याच्या साठी काहीतरी करतोय..
एक वेगळंच सुख मनाला दिलासा देताय..